Luke 13

पश्चात्ताप करण्याविषयी बोध

1त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालील प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्याविषयी सांगितले, 2त्याने त्यांना उत्तर दिले, “या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते, असे तुम्हास वाटते का? 3मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल.

4किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरुशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का? 5नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”

अंजिराच्या निष्फळ झाडाचा दृष्टांत

6नंतर त्याने हा दाखला सांगितला, एका मनुष्याने त्याच्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते, त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पाहावयास आला परंतु त्यास काहीही आढळले नाही. 7म्हणून तो माळ्याला म्हणाला, “पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?”

8माळ्याने उत्तर दिले, “मालक, हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्यास खत घालीन. 9मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”

शब्बाथ दिवशी रोग मुक्त झालेली स्त्री

10आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. 11तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.

12येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.” 13नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली. 14नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे. तो लोकांस म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”

15येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? 16ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”

17तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.

मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा दृष्टांत

18मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्यास कशाची उपमा देऊ. 19देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”

20तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ? 21ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”

तारणप्राप्तीचे अरुंद प्रवेशद्वार

22येशू यरुशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता. 23कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला, 24अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.

25घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही. 26नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले! 27आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा.

28तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल. 29आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. 30जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.

हेरोदाचे वैर

31त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.” 32येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’ 33तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरुशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.”

यरुशलेम शहराची स्थिती पाहुन केलेला विलाप

34यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांस एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. “पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”

35

Copyright information for MarULB